हिंदू Quotes

Rate this book
Clear rating
हिंदू  (हिंदू, #1 ) हिंदू by Bhalchandra Nemade
556 ratings, 4.33 average rating, 37 reviews
हिंदू Quotes Showing 1-7 of 7
“साधेपणा किती उदात्त असू शकतो , हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. राहतील. हिंदू लोक काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात गच्च जपून ठेवली आहे. सगळं तिथे अंधारात कुठेतरी ठेवलेलं असतं. ते न दिसू दे. न हरवू दे. स्मृतीतून सुद्धा जाऊ दे. काही बिघडत नाही. केव्हातरी सापडेलच.”
Bhalchandra Nemade, हिंदू
“ ह्या अर्थशून्य विश्वव्यापारात जाणीवा म्हणजे आपल्या नगण्य जगण्याला आधार देण्याच्या फारच कृत्रिम सबबी आहेत ! ”
Bhalchandra Nemade, हिंदू
“आजीआजोबा, आईबाप अशी भरपूर माणसं असलेल्या कुटुंबातली मुलं लवकर शहाणी होतात, असं संशोधनानं सिद्ध झालं आहे.”
Bhalchandra Nemade, Hindu : Jaganyachi Samriddha Adgal
“एकदा एक मजूर आणि मी मोठा टॉर्च घेऊन किल्ल्याखालच्या तटामधून कुठे भुयाराचं तोंड असावं, याचा शोध घेत चाललो होतो. सकाळची वेळ. अचानक एका विवरातून ऊद पळत बाहेर पडलं आणि पुन्हा आत शिरलं. भी लगबगा खुणा टोचत त्याचा पाठलाग करत चाललो. समोर टॉर्चेनं पाहता पाहता एकदम पुरुषभर खड्यातच कोसळलो. माझ्या मागचा मजूर घाबरून मागच्या मागे पळाला. खूप आत दूरवर लहानसा उजेडाचा ठिपका दिसत होता. भुयार सापडलं. पण इथे किती वेळ असं उभं राहणार? मागेही जाता येत नाही. धरकाप. बाकीचे लोक येईपर्यंत मी मागे टॉर्च दाखवत संध्याकाळपर्यंत उभा होतो. खंडेराव, त्या अंधारात तू न घाबरता न पळता पाय रोवून उभा राहला होतास, तसाच कोणत्याही कामात उभा राहत जा. इथला ऊद जसा जमिनीतून कोणाला कळणार नाही, असं वेडंवाकडं वर खाली गिरकी घेणारं तिरपंतारपं विळ उकरून इथेच कुठेतरी सुरक्षित जागेवर लपून बसलेला आहे. तसाच तूही वर्तमानकाळात बसून राहा. कान, डोळे, नाक, मिशा क्षणाक्षणाला तख ठेवून ह्या प्रतिकूल परिस्थितीला केव्हा अनुकूल करता येईल, याची वाट पाहत तो बिळाबाहेर पडला होता, तसा तूही ऐस. हे अफाट विश्वातलं तुझ्या आयुष्याचं बुजलेलं भुयार खणत राहा. कचरू नको. धज. शेवटी एक उजेडाचा बिंदू असतोच सुटकेचा. असाच आत्ममग्न आत्मकेंद्री हो. खणत राहा, ती चांदणी, ते उजेडाचं टोक केव्हातरी तुझ्याही वाट्याला येईल, तोच शेवट. तेच यश, पूर्णविराम”
Bhalchandra Nemade, हिंदू
“गरीब श्रीमंत सगळ्या जातींच्या बायकांना अशा वेळी लक्षात येतं की आपल्या आयुष्याला वेगवेगळ्या वळशांनी बांधून ठेवणाऱ्या दोराची शेवट एकच गाठ असते – बाळंतपण.”
Bhalchandra Nemade, हिंदू
“आणि युरोपी संवेदनवर्चस्वामुळे आलेली रोगट स्वच्छता साबण, पावडरी, छानछोकी? एका बादलीत सगळे घाण कपडे आधी खंगाळून मग दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याच्या बादलीत ते धुऊन काढणं- साबणाची गरज काय? ह्या बगळ्यासारखा शुभ्र रंगापेक्षा गांधी विनोबा यांच्या खादीच्या धोतरांचे पिवळट रंग निर्मळ नव्हते? हात धुवायला राख काय वाईट? केसांना काळी माती? शिकेकाई? आणि बायकांची स्वयंपाकातली उर्जेची बचत ? बिजा, एकदम सगळी लाकडं चुलीत ढोसू नको. एकेक लावत राहा. पुढे भाकरी होईपर्यंत मागच्या भानचुलीवर वरण ठेव. तिकडे चूल गरम राहते, तिथे दूध ठेव. छबू, स्वैपाक झाला की लगेच लाकडांवर पाणी टाक, कोळसा तरी मिळेल. आहारावर दूध तापत राहील, साय चांगली येते. लाडके, राख साठवून ठेव. भांडी घासायला चांगली राख काढून ठेव. बाकीची उकिरड्यावर. पोरांनो, पेल्याला तोंड न लावता वरून पाणी प्या, तेवढीच मोरीत भांडी कमी पडतात, भावडू, अरे इतकं कडक पाणी आंघोळीला? ताजं आडाचं पाणी एकदा घेऊ पाहा आंगावर... किती छान गरम असतं.”
Bhalchandra Nemade, हिंदू
“दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणजे कोण्या अज्ञाताचं कर्ज फेडण्याचाच प्रकार. अशा गुंगलेल्या अवस्थेत खऱ्या जाणिवा सामोऱ्या येतात. आधीच्या नंतरच्या संधिप्रकाशात त्यांचे पदर घेतलेले अपुरे चेहरे भेसूर दिसू दे, स्वा वाईट नाही आहेत. त्यांचं माहेर कुठेतरी नभोमंडलात ईथराच्या वरच्या कृष्णद्रव्यात असतं. जाणिवा असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर जागेपणी कुठलं तरी अज्ञान काम करत असतं. मुंग्या वारुळाबाहेर सगळ्या सर्वकाळ कुठे दिसतात? पण आत त्यांचं किती मोठं साम्राज्य असतं? आणि त्यांच्या सगळ्यांच्या सरळमार्गी एकचित्त हटवादी हालचालींवर कुठल्यातरी आंधळ्या निष्ठेच एक अदृश्य नियंत्रण असतं, ते कोणाला दिसतं? तुझ्या जाणिवांचं हे प्रचंड वारूळ जमिनीत किती खोल आहे, हे पाहा.”
Bhalchandra Nemade, हिंदू