पुळणीत टेकलेले

पुळणीत टेकलेले माथे अधीर नाही
दर्यासही जरासा इथल्या समीर नाही

स्वप्ने नकाच देऊ आता नवी कुणाला
ध्येयास पेलणारे कुठले शरीर नाही

सर्वत्र होत आहे शृंगार क्षुद्रतेचा
का दुर्बळांत येथे कोणीच वीर नाही?

उल्का बुडून गेल्या विश्वांस सांधणाऱ्या
डोहास कालियाच्या का पैलतीर नाही?

प्रासाद-झोपड्यांच्या आहेत दूर रांगा
पुतळ्यास एकतेच्या त्यांची फिकीर नाही

होईल पुत्र कैसा राजास जाणता या
पूजेस देव नाही कौलास पीर नाही... 

- कुमार जावडेकर 

(संदर्भ / प्रेरणा - कुसुमाग्रजांच्या ' टिळकांच्या पुतळ्याजवळ' तसंच 'स्मरण' आणि 'पृथ्वीचं प्रेमगीत' या कवितांमधील प्रतिमा)
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on August 01, 2024 10:18
No comments have been added yet.