सखी

...चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्‍यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.

कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील? केव्हातरी नि:शब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही. त्याला सीमा नाही. म्हणुनच आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद 'मूक' असतो. माणूस नि:शब्द होतो.

श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक. म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हण्तात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यचं प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.

प्रकाश रोकठोक असतो. लपवालपवीचा खेळ फ़क्त अंधारापाशी असतो. अंधार आणी आतल्या गाठीची माणसं सारखीच.

प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्टा, पद ह्यामागे धावणारा माणूस फ़ार केविलवाणा वाटतो.

समाज तप्त सुर्यासारखा असतो. आगीचा कितीही वर्षाव झाला तरीही ती सूर्यफ़ुलं सूर्याकडेच पाहत राहतात. तोंड फ़िरवीत नाहीत. माझ्यासारख्या निराधार बाईकडे समाज असाच बघत असतो. सूर्यासारखा रोखून. अशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत रहायचं हे मला सूर्यफ़ुलांनी शिकवलं.

ज्या माणसाशी आपण मैत्री करतो, त्याला अंश:त का होईना, समृध्द करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पहाव.

एक ओढा आहे. किंवा झरा समज. एका उडीत आपल्याला तो पार करता येईल असा नसतो. त्या प्रवाहाच्या मध्यभागी एक मोठा दगड असतो. त्याचा आधार देऊन दोन टप्प्यांत आपण पलीकडच्या तीरावर जातो. तो मधला दगड म्हणजे 'सेक्स'. ते साधन असावं. साध्य नसावं.

सावली देऊ शकणार्‍या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.

लेखकाच्या संदेशावर जग बदललं असतं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर कोणत्याच वाड:मयाची, साहित्याची निर्मीती झाली नसती.

चांदी-शुध्द चांदीचीच भांडी काळी पडतात. त्यातली चांदी नाहीशी होत नाही. थोडं पाँलिश केलं की झालं.
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on November 15, 2007 22:02
No comments have been added yet.


V.P. Kale's Blog

V.P. Kale
V.P. Kale isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow V.P. Kale's blog with rss.