वर्ष नव्हे ऋतूचक्र

जात्या वर्षाला म्हटलं, थांबून गप्पा करूया
ओलांडलेला एकेक आपला टप्पा स्मरूया 

म्हटलं घराचे हप्ते वर्षात फिटले थोडे
मुलांचेही शिक्षणात पुढे दामटले घोडे
वाढीसकट राहिला पगार-बिगार चालू 
घेतला नाही तरीही - शक्य होतं घेणं शालू
काही मनाजोग्या गोष्टी, वाईटही झाल्या काही
कधी बातम्यांनी केली संतापानं लाही लाही
तू मात्र देत गेलास- पाऊस थंडी उन्हाळा
प्रत्येक वर्षी त्याच त्या आठवणींना उजाळा
वर्ष काय बोलणार, मीच सांगत बसलो
हव्या-नको त्या स्मृतींच्या मृगजळात फसलो
उमजलं मग तुम्ही, वय - वर्ष दोघे भाऊ!
नंबरांच्या स्पर्धेतले मातबर ऐतखाऊ 
घडायचं ते घडतं, करायचं ते उरतं
वय वर्ष मात्र सदा पुढे पुढे सरकतं
कळतं तुम्ही निमित्त, करायला मौज मस्ती, 
हरकत नाही माझी स्मरायला जुनी दोस्ती
तू कोण हे न कळता पक्षी-प्राणी जगतात
योग्य वेळी आपापली स्थलांतरं करतात
माणसा-माणसांचा का वर्षारंभ बदलतो?
'शक' मनी दृढ होतो, आणि काळ बिघडतो...
म्हणून म्हणतो आता तुझं नाव बदलूया
वर्ष नव्हे ऋतूचक्र इतकं तुला मानूया!
- कुमार जावडेकर
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on March 30, 2025 23:59
No comments have been added yet.