मोहमाया कशास मी त्यागू?
पण नवा श्वास मी कुणा मागू?
वागणे जाणुनी तुझे सारे -
मी तुझ्याशी तसे कसे वागू?
आगळी वेगळी प्रथा इथली
सांग होईल का तुला लागू?
तूच नाहीस जर इथे चंद्रा...
रात्र मी का अशी वृथा जागू?
शून्य बाकी उरे जिथे त्याला
सांग ना मी पुन: कसे भागू?
- कुमार जावडेकर
Published on January 28, 2025 23:13