भारतीय संस्कृती Quotes

Rate this book
Clear rating
भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती by Sane Guruji
85 ratings, 4.25 average rating, 0 reviews
भारतीय संस्कृती Quotes Showing 1-15 of 15
“आज संस्कृतिरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बांधू पाहात आहेत. परंतु हे संस्कृतिरक्षक नसून संस्कृतिभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहात आहेत व आतील प्राण गुदमरवीत आहेत. हे सनातनी नसून अ-सनातनी आहेत. सनातन या शब्दाचा अर्थच काय? “सनातनो नित्य नूतनः।” जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली, ते झाड मरणार असे समजावे.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“हात अधिक पवित्र होतील, आजच्यापेक्षा उद्या हे डोळे अधिक प्रेमळ व प्रामाणिक होतील, आजच्यापेक्षा उद्या हृदय विशुद्धतर व विशालतर होईल, आजच्यापेक्षा बुद्धी उद्या अधिक स्वच्छ व सतेज होईल?”
Sane Guruji, भारतीय संस्कृती
“रस्त्यात कर्मशून्य होऊन नारायण म्हणत बसलो, तर माझ्यापुढे पैशांचे ढीग पडतात. परंतु मी रस्त्यातील घाण दूर करीन, विष्ठा उचलीन तर मला प्यायला पाणी मिळत नाही; मग पोटभर जेवावयाची तर गोष्ट दूरच राहिली! कर्महीनांना पाद्यपूजा मिळत आहेत आणि कर्ममय, श्रममय ज्यांचे जीवन आहे, त्यांना लाथा बसत आहेत, त्यांचा पदोपदी उपहास होत आहे!”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“मी जे जे कर्म करतो ते उत्कृष्ट, असे ज्याला म्हणता येईल तो धन्य होय.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“कर्म उत्कृष्ट व्हावयास आणि कर्माचा कंटाळा न वाटावा म्हणून कर्माची आवड असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी कर्म करावयाचे त्याच्याबद्दल मनात प्रेम हवे. कर्माबद्दल मनात प्रेम हवे, व ते कर्म ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याबद्दलही अपार प्रेम हवे.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“सेवेचे कर्म उत्कृष्ट व्हावयास पाहिजे असेल, तर साधने पवित्र माना. सजीव-निर्जीव साधने पवित्र माना. त्यांना प्रसन्न ठेवा. दुसरा देव नाही, दुसरा धर्म नाही. जो कारखानदार मजुरांना देवाप्रमाणे मानील, त्यांना स्वसेवेची पवित्र साधने मानून त्यांना संतुष्ट ठेवील, त्याच्याहून देवाला कोण अधिक प्रिय वाटेल?”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“लेखणी असो वा तलवार असो, तराजू असो वा नांगर असो, चूल असो की झाडू असो, आरी असो की वस्तरा असो, ही सारी सेवासाधने भारतीय संस्कृती पवित्र मानते; आणि नव्या युगात जी नवीन सेवासाधने निघतील, तीही भारतीय संस्कृती पवित्र मानील.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“परंतु आपला समाज जेव्हा बदल करीत नाही, तेव्हा तो फार मोठी चूक करीत असतो, हे त्याच्या लक्षात येत नाही. जुन्या जीर्णशीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा येईल? अंगरखा तरी मोठा करा नाही तर मला तरी सदैव लहान ठेवा, असे त्या मुलाला म्हणावे लागेल! रूढीचे कपडे हे सदैव बदलत असावेत. उन्हाळ्यातील कपडे थंडीत चालणार नाहीत, थंडीतील कपडे उन्हाळ्यात चालणार नाहीत हा नियम आहे. असा बदल न कराल, तर थंडीत गारठून मराल व उन्हाळ्यात उकडून मराल!”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात! परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा. आणि स्वतःच्या समाजाला काय हितकर ते बघा.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“ज्ञानाचा प्रांत कोणताही असो, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचे टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो, तोच ऋषी.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“ज्ञानाशिवाय भक्ती अंधळी आहे, भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे, आणि कर्मात अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान-भक्तीस अर्थ नाही. ज्ञानमयी गंगा भक्तिमय यमुनेत मिळू दे, आणि कर्ममय सरस्वतीस भक्ति-ज्ञानाचा स्पर्श होऊ दे.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“नदीत बुडलेले डोके नदीप्रमाणे होईल. नदी पाप दूर करते. डोक्यातील घाण व हृदयातील घाण अंगावरील घाणीबरोबर वाहून जाते. नदी म्हणजे काय? नदी म्हणजे शेकडो ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रवाहांचे परममंगल अद्वैत दर्शन होय! नदी म्हणजे अद्वैताची मूर्ती! नदी म्हणजे सुंदर, उदार, परमोच्च सहकार्य! ते शेकडो प्रवाह परस्परांस तुच्छ समजत नाहीत. गटार येवो की दुसरा कोणता प्रवाह येवो, सारे एकत्र येतात. “आपल्यातील घाण खाली बसेल, आपल्यातील प्रसन्नता प्रकट होईल.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे; अद्वैंत म्हणजे अनुभूती.”
साने गुरुजी, भारतीय संस्कृती
“जेथें तेथें देखें तुझीच पाऊलें    सर्वत्र संचले तुझें रूप” स”
Sane Guruji, भारतीय संस्कृती