गोळी लागल्यानंतर खाली कोसळताना महात्मा गांधी ‘हे राम’ असे म्हटलेच नाहीत असा युक्तिवाद ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात ऐकला होता. ज्या पद्धतीने नायकाने प्रेक्षकांना ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला होता तो नक्कीच वाखाणण्याजोगा होता. जेंव्हा मी ते नाटक पहिल्यांदा पाहिले होते, तेंव्हा मला त्यांचा युक्तिवाद पूर्णपणे पटला होता. गांधीजी मरताना ‘हे राम’ म्हटले असे कुणीतरी मृत्यूनंतर पसरवले असावे यावर मला पूर्ण विश्वास पटला होता आणि तो विश्वास इतका दृढ झाला होता की त्याबद्दलची शहानिशा करावीच वाटली नाही. अनेक वर्षानंतर जेंव्हा मी महात्मा गांधींविषयी अभ्यास चालू केला तेंव्हा सत्य समोर आले.