जेव्हां मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हां त्यास आपले मनांत उभ्द्रवलेले विचार स्पष्ट रीतीनें इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखवितां येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळें मोठे महत्त्वाचे असून लोकांचे हितावह कां असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळवितां येत नाहींत; आणि असें झालें म्हणजे कांहीं काळानें ते सर्व विचार लयास जातात.

