More on this book
Community
Kindle Notes & Highlights
अनेक समस्या, त्या क्षणी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं. तसंच काहीसं... अनेक समस्यांचं...
सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणींच्या राज्यातच तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर त्यापायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले, म्हणून त्रास!
–आठवणीवरून आठवणी निघतात. एकाच रागदारीत रचना केलेली गाणी जशी लागोपाठ आठवतात, तसं होतं. एकाच रागदारीचे स्वर दोन गाण्यांत असल्याने, एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्यावर कधी व कसे गेलो हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे, उत्कटतेने बांधलेले दोन वेडे एकत्र येतात, तेव्हा एका वेड्याच्या हकिगतीतून, दुसऱ्या वेडयाच्या गोष्टी कधी सुरू होतात, हे कळत नाही. एकातून दुसरी, त्यावरून तिसरी हा प्रवास कुठे थांबेल हे सांगता येत नाही,
गतकाळातील फोटो म्हणजे काय? आपलंच हूल देत गेलेलं वय आपल्याला फोटोतून भेटायला येतं.
काही माणसांचा व्यवसायच असा असतो की त्याला काळवेळाचं शेड्यूल नसतं. म्हणूनच अनियमित वेळापत्रकाच्या माणसाला सांभाळायचं असेल, तर कुटुंबातल्या इतर माणसांना काटेकोर दिनचर्या हवी.
“आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की, ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसेल किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे.”
कबुतराला गरूडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं. दिवसाचे अकरा तास हे हात जर राबले तरच एक तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते. मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत, सगळ्यांच्या. “the best helping hand is at the end of your arms.”
वाचेलल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं. नाहीतर बाईने केसात गजरा माळावा तसं त्या पुस्तकाचं होतं. तिला स्वतःला तो गजरा कधीच दिसत नाहीत. गजरा आहे, इतकंच समाधान. त्याच गजऱ्याबद्दल कुणीतरी बोललं की तिला तो गजरा दिसतो.
एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. आवडली नाही तर. पण नवा विचार स्वीकारणं ही खूऽऽप मोठी घटना आहे.
सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं, त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फक्त प्रत्येकाने आठवून पाहावं.
आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेली पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं. त्याच्यासाठी पूर्वनियोजित आखून दिलेला मार्ग नाही. म्हणून आयुष्यालाही दिशा नाही. आपण ठरवलेल्या दिशेनेच जात राहू, मुक्कामाचं ठिकाण जे निश्चित करू, तिथंच पोचू, ही शाश्वती नाही.
तुमचा स्वतःचा आयुष्याचा अनुभव हाच तुमचा गुरू.
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो.