मराठीअक्षरमित्र discussion

Gondan (Marathi) (Marathi Edition)
This topic is about Gondan (Marathi)
3 views
०२. पुस्तक-परीक्षण | Book Review > #३. भावनांचं काव्यमय "गोंदण"

Comments Showing 1-1 of 1 (1 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by अनिकेत (last edited Jan 21, 2026 08:19AM) (new) - rated it 5 stars

अनिकेत (mahajanianiketanil) | 51 comments Mod
आज फारा दिवसांनी मराठी कवितेचं पुस्तक हातात घेतलं आणि तेही शांताबाईंचा कवितासंग्रह ! त्यांच्या या काव्यसंग्रहातील काही कविता मनावर गारुड करतात तर काही कायमचं "गोंदण"!

काही कविता खास प्रयत्न न करता लक्षात राहतात, दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमात असलेली "पैठणी" ही त्यापैकीच एक. अगदी प्रत्येक ओळ भावुक करणारी... असं म्हणतात माणुस भुतकाळात रमतो ते इथं फक्कड लागु होतं. आजीची पैठणी, तिचा मऊ, उबदार स्पर्श आणि कितीतरी सुखद क्षण तिचे आजीसोबत असतील, “शेवंती-चमेलीची आरास पदराआडुन हसली”…”वर्षामागुन वर्षे गेली संसाराचा सराव झाला” आजीच्या नवखेपणात व पुढे तिच्या आयुष्यात चढ-उतारांना तिनं जवळुन पाहिलं असेल, सुखासह भोगलेली दुःखं, मनास मुरड घालुन केलेल्या तडजोडी, त्याला सरावलेलं/सावरलेल्या आजीच्या मनागत तीही “नवाकोरा कडक पोत” सोडून “मऊपणा” ल्याली असेल, एक न् अनेक स्मृती... पाहिलेल्या, ऐकलेल्या या शब्दांतुन शांताबाईंना सुचवायच्या असतील.माझ्यासारख्या आजोळी राहिलेल्यांच्या बाबतीत तर ही कविता मनात नक्कीच घर करुन राहते. ती वाचताना ठायी ठायी आजी आठवत राहते. मग या कवितेपायी हातात घेतलेलं“गोंदण” त्यातल्या इतर कवितांचीही भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही, मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.

कधी काही गोष्टींना आपण गृहीत धरतो आणि कधी काही नात्यांना..."देवपाट" अशीच एक जुनी गोष्ट... तसा फारसा विचार करायला न लागणारी मुख्यतः जुन्या काळी वापरली जाणारी एक वस्तु खरी, पण त्यालाही शांताबाईंनी उत्कट शब्दात अलगद गुंफलंय... "आजोबा" हि अजुन एक कविता.. "मातीला ओढ मातीची..." हा तिचा शेवट तर केवळ निःशब्द करणारा…

उतारवय,(पिकनिक संपत आली आहे) जीवनाची क्षणभंगुरता दाखवून देणारी “युती मात्र निमिषार्धाची” उदासीनतेची छाप असलेल्या काही कविता-“जगण्याचे फक्त पुढे भासआभास लांबले”(कधीतरी).

स्रीचं प्रेम, दुःख, वेदना, भीती निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपकांतुन प्रतिबिंबित करणाऱ्या कविता आहेत “माझ्यासाठीच वळणावर टपुन होते रान?”(कट) “आज परंतु मुकी आणखी सोशिक आहे माती”(कळते आहे)... काहीत घुसमट, “कैद अनंत जन्मांची, वाढे घटका घटका”-(माझ्यापासुन कितीदा) काहीत सल, “फट्ट कपाळामागे सारं काही दडवुन, उजाड डोळ्यांत तिनं चंद्र टाकला बुडवुन” (अतर्क्य) काहींमधे सहज स्त्रीमनाचे तपशीलवार चित्रण निसर्गातल्याच एखाद्या साध्या प्रसंगाची वानगी देऊन बेमालुम मिसळलंय.

फोर्ट, कनॅाट प्लेस, पैठण अशा स्थळांवरही कविता आहेत.

लहानपणीच्या आजोळच्या गोड आठवणींना कुरवाळायला आणि एका सिद्धहस्त कवयित्रीच्या लिखाणाचा आनंद लुटायला हे पुस्तक वाचलंच पाहिजे.. संग्रही ठेवलं पाहिजे कारण मनाच्या कोपऱ्यात असलेलं अशा कडुगोड स्मृतींचं आपलंसं वाटणारं गोंदण परत परत न्याहाळता यायला हवं…

फक्त "पैठणी" साठी या संग्रहाला पैकीच्यापैकी गुण...
तुम्हाला काय वाटतं?

~अनिकेत
(किंक्रांत, १५.०१.२६)

तळटीप~ प्रिय आजीस, तुझी खुप आठवण येते आहे. ईहलोकीची यात्रा संपवुन तु केव्हाच आमचा निरोप घेऊन गेलीस, तरी तुझ्या प्रेमळ आठवणींचं गोंदण मनावर अजुनही उमटलेलं आहे, केव्हातरी या देहाबरोबरच ते ही कायमचं पुसलं जाईल.


back to top