‘ठीक आहे,’ विश्वामित्र म्हणाले.‘मालाच्या प्रत्येक साठ्यासाठी तुला पाच लक्ष सुवर्णमुद्रा द्याव्या लागतील आणि दर वर्षी किमान तीन साठे घ्यावे लागतील.’ ही अतार्किक किंमत होती. कुबेर देत असलेल्यापेक्षा कितीतरी जास्त. आणि किमान खरेदीची अट तर अपूर्वच होती. पण रावण अजिबात बावचळला नाही. त्याचे हिशोब तयार होते. ‘मला किंमत मान्य आहे, गुरुजी. पण मी किमान खरेदीची अट मान्य करू शकत नाही. मी किती वेळा विमान वापरणार आहे ते मला माहीत नाही. दर वर्षी तीन खरेदी करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. पण काही वर्षी मला ते जमणार नाही. त्याबद्दल मला दंड होऊ नये.’