तो अंथरूण धरून पडला तेव्हा मी एकटा होतो. शेजारीपाजारी म्हणाले, तुलाही संसर्ग होईल. तू घरी निघून जा. निदान गावात रहायला जा. प्रत्यक्ष भाऊ मरायला टेकला आहे आणि आपण जाऊन पाहूसुद्धा नये, लांबून चहाकॉफी ठेवून निघून जावं हे मला सहनसुद्धा होईना. झाला तर झाला आपल्याला कॉलरा. माणूस टाळून असं मरतुकडं जगण्यापेक्षा न जगलेलं चांगलं. करायचं काय तसं भेकड जगून? पण भाऊ दोन दिवसांत मेला. माझ्याकडे प्रेमानं पहात डोळे मिटून मेला. मला तो क्षण ज्यास्त मोलाचा वाटतो. अजून त्याची पत्रं वाचली की मला अभिमान वाटतो. निव्वळ स्वत:पुरतं स्वातंत्र्य मिळवायची तुमची कल्पना मला पटत नाही.