कॉलेजात आल्या आल्या इंग्रजी पेपर बळकावून दिवसभर वाचत बसणाऱ्या इतिहासाच्या कुलकर्ण्यांनी वारंवार दिवाळीच्या फराळाला या म्हणून म्हटल्यानं भोळे आणि चांगदेव एका संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. त्यांनी दिवाणाखान्यात सतरंजीवर बैठक मारली होती आणि चाऱ्ही बाजूंना युनिव्हर्सिटीच्या पेपरांचे ढीग रचलेले होते. कुलकर्णी अधूनमधून पेपरावर बरोबरच्या खुणा सपासप करत वरतून चांगदेवाशी बोलत पेपरामागून पेपर उचलत संपवून फेकत होते. लगेच कुलकर्णींबाई चष्मा वारंवार वर करत नवऱ्यानं खास तिच्यासाठी कोरा ठेवलेला एक प्रश्न तपासून बेरजा करून पेपर संपवून गठ्ठयावर नीट ठेवून देत होत्या.