चांगला देशपांडे म्हणाला, ह्याला निश्चित इंग्रजीची डिग्री नसावी. परवा सी मी बिफोर आफ्टरनून अशीच मला चिठ्ठी पाठवली! बिफोर आफ्टरनून म्हणजे काय? इंग्रजीचा हेड हा. कमाल झाली. बाराशे रुपये पगार घेतो भडवा फुकट. खरवंडीकर म्हणाला, मोनोलॉग शिकवतांना हा काय म्हणाला, ए मोनोलॉग इज अ डायलॉग बिटवीन वन पर्सन ओन्ली! हि हि हि हि हि! चांगदेव म्हणाला, मला वाटलं भल्ला आधी तिकडे पाकिस्तानात ड्रायव्हर असावा. वाटतं ना तसं?....शरीर वगैरे ड्रायव्हरसारखंच आहे, पण त्याच्या तोंडात गिअरमें ले लिया, बॅटरी चार्ज करके आव, अॅक्सिलेटर मत दबाव असं येतं नेहमी.