भोळे म्हणाला, आता मला तसं तातडीनंच विचारप्रधान पुस्तक लिहायचं होतं भारतीय लोकशाहीच्या भविष्याबद्दल. पण लक्षात आलं आहे की फुकट ओढाताण करून बायकोला मुलासकट माहेरी पाठवून, नोकरीची फालतू कामं सांभाळून, पुन्हा शिकवायची न् अभ्यास करायची दगदग वेगळीच-तर असं सगळं करून सुटीत परीक्षेच्या पैशाला चाट देऊन बैठक मारा, जाग्रणं करा, सिग्रेटीमागून सिग्रेटी प्या, चहामागून चहा प्या, तासातासानं तंबाखूचा तोबरा द्या-असं रात्रभर करा! उगा म्हणता म्हणता टी.बी. न् कॅन्सर झाला तर औषधापुरतेसुद्धा पैशे ह्या भारतीय लोकशाहीच्या पुस्तकामधून मिळायचे नाहीत! करू सावकाश पुरं. त्याआधी लोकशाही गडगडली नाही ह्या देशातली तरी पुरे.