जरा पोरगं बिनचूक इंग्रजी वाक्य बोललं की बाप खूष व्हायचा. तेव्हा भोळेनं नेहमीप्रमाणे मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं असा बोध सुरु केला. त्याबरोबर माईणकर गृहस्थ भडकून इंग्रजीच्या महत्त्वावर बोलत राह्यला. इंग्रजीमुळेच सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू वगैरे जगविख्यात लेखक झाले असंही तो म्हणाला. भोळे म्हणाला, कोण म्हणतं हो त्यांना जगविख्यात? हिंदुस्थानाबाहेर कोणी विचारत नाही ह्यांना. आपले जगविख्यात लेखक म्हणजे मातृभाषेतून लिहिणारेच आहेत तुकाराम, बंकिम, प्रेमचंद वगैरे.