ठोसर म्हणाले, तुम्हाला ब्राम्हणांच्या शाळांमधे मुलं घालावीशी वाटतात, तुम्हाला आमची संस्कृती पाहिजे पण आम्ही नको! ब्राम्हणांचे उच्चार तुम्ही शिकता, ब्राम्हणांचं वळण, ब्राम्हणांची रहाणी तुम्हाला हवी, पण ब्राम्हण मात्र नको! भोळे म्हणाला, तुम्ही आपण होऊन दुसऱ्यांना हे दिलं असतं इंग्रजांसारखं तर हा ब्राम्हणव्देष जन्मालाही आला नसता. असं इतिहासात-पुराणांत एकही उदाहरण नाही की ब्राम्हणांनी आपली विद्या शुद्रांचा उद्धार व्हावा म्हणून उदार मनानं दिली. उलट तुम्ही ती मतलबीपणानं कुलपात ठेवून सडू दिली आणि देशाला खड्डयात घातलं.