शरीर थकलं की आपोआप मनही थकून जातं. त्यासारखं दुसरं समाधान नाही. मन थकलं की भलते भोवरे मनात तयार होत नाहीत. भोळे म्हणाला, पण एवढ्यावर तुमच्यासारख्या तरुण माणसानं थांबावं असं मला वाटत नाही. शरीराला आणि मनाला थकवणारं काहीतरी असलं पाहिजे, पण काही तरी चांगलं करायचंही एक मनात असलं पाहिजे. त्याशिवाय जगण्यात काही पॉइंट नाही. चांगलं म्हणजे आपल्या दृष्टीनं जे काही चांगलं असेल ते-पण तसं काहीतरी पाहिजेच.