पहिल्या आठवड्यात कुतूहल म्हणून विद्यार्थी खूप गर्दीनं हजर राह्यले. पण कोणत्याही प्राध्यापकामागे कोणतेही सत्तर विद्यार्थी लावून दिल्यामुळे नावगाव ओळीनं विचारण्यापलीकडे कोणाला काय बोलावं हे कळेना. विद्यार्थीही गप्प बसून राह्यले. काही प्राध्यापकांनी विनोद सांगितले. काहींनी ह्या योजनेची टिंगल सुरु केली. गंगातीरकरनं तर इंग्रजी कसं सुधारावं ह्यावर लेक्चरच सुरु केलं-त्यामुळे त्यानंतरच्या बैठकीला एकही मुलगा हजर नव्हता. शेंडे तर मुलांवर ओरडला, अरे तुमची मनं समजावून घ्यायचीत! बोला बे!