शेंडेनं एक मजेदार गोष्ट सांगितली: आपले क्षीरसागर काल तीन तास शिकवून पुरे थकले आणि संध्याकाळी चौथ्या तासाला थर्ड इअरच्या वर्गावर गेले. अर्धाच तास बडबडून कंटाळा आल्यावर ते उगाच मुलांना म्हणाले, तुम्हीसुद्धा काही रिस्पॉन्स दिला पाह्यजे, प्रश्न उपस्थित केले पाह्यजेत, चर्चा केली पाह्यजे. मीच वर्गात का म्हणून एकटं बोलत रहावं? तर वर्गातलं एक पोरगं ओरडलं, कारण तुम्हाला पगार दिला जातो! क्षीरसागर बिचारा आधीच नर्व्हस माणूस, पार खलास झाला काल!