नवीन वाहन घेतलं की, आठ-दहा दिवस आपण स्वतः धुतो. कालांतराने कपड्याचे चार-पाच फटके मारून भागवतो. हेच थोड्याफार फरकाने प्रत्येक बाबतीत. नावीन्याला सर्वांत मोठा शाप परिचितपणाचा. स्वतःच्या दोन-तीन वर्षांच्या अपत्याचे लडिवाळ चाळे किंवा हालचाली ह्यांतही माणूस किती काळ रमतो? आनंदाला फक्त एकच दिशा असते. ती दिशा ‘स्वतःची दिशा.’ म्हणूनच सगळ्या गोष्टींतला रस तत्काळ संपतो किंवा सुखवणाऱ्या एकूण एक गोष्टींच्या वर्तुळाने घेरूनही माणूस अस्वस्थ असतो.