श्रावणमासातली चांदणी रात्र होती. अधुनमधून काळे ढग भरून येत होते. असं आभाळ भरून आलं की पावसाची एखादी सर यायची. ढग पुढं सरकायचे आणि आकाश पुन्हा स्वच्छ व्हायचं. एखाद-दुसरा ढग तेवढा थबकल्यागत एकाच जागी स्थिर असायचा. बाकी सगळीकडे आकाश निळंभोर दिसायचं. ढगाआड दडलेली नक्षत्रं उघडी करून डोळ्यांना मोह घालायची. आभाळ भरून आलं होतं. चार थेंब येऊन एक सर पडून गेली होती. निळ्याभोर आकाशात चांदण्या चमकत होत्या. निरांजनातील वातीच्या मंद प्रकाशागत चांदणं पडलं होतं. स्वस्थ चित्तानं विसावा घेत राहावं तसं सारं गाव स्तब्ध दिसत होतं. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. झाडांची पानं तेवढी सळसळत होती आणि त्यांच्या सावल्या
...more