एकाएकी गार वारा जोरानं वाहू लागला. म्हातारा लिंब मान हलवत उभा राहिला. गारा पडाव्यात तशा निंबोण्या पडू लागल्या आणि काळ्या ढगांची सावली चालत आली. समोरचा चिरेबंदी वाडा अंधुक झाला. लिंबाचा संभार झाकळून गेला. बोळाचं तोंड दिसेनासं झालं आणि सडसड पावसाची सर कोसळू लागली. डोक्यावरच्या पत्र्याचा आवाज आलाव्यातल्या ताशागत होऊ लागला. आकाश आणखी काळं होऊन आलं. पत्र्याच्या पन्हाळी पुढं झेप घेऊन गळू लागल्या. गटारं तुडुंब भरून वाहू लागली. समोर दिसणारं लिंबाचं झाड करकरू लागलं. पाण्याचे तुषार खिडकीतून आत येऊ लागले. छपरावर पडणारं पाणी भिंतीवरनं उतरून खोलीत येऊ लागलं.