माई फारशी शिकलेली नाही. तिनं शेक्सपिअर वाचलेला नाही; पण तिच्यापाशी दुःख पचविण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. आक्का गेली, तेव्हा मिलिंदाला पोटाशी धरून ती दोनच शब्द बोलली, ‘देवाची इच्छा!’ काळजाच्या फुटलेल्या धरणाला या दोन शब्दांनी बांध घातला तिनं! तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जिवाच्या आकान्ताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाले आहे. ही माझी एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही! आमच्या पिढीचं दारुण दु:ख आहे हे! आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची, हा आमच्यापुढला खरा प्रश्न आहे!

