या जगात जिथं जावं, तिथं मुखवटे भेटतात! त्यामुळं सत्याची आणि आपली कधी तोंडओळखच होत नाही. माणसांच्या मुखवट्यांची या सोंगाढोंगांची चीड येते मला. नंदाताई, हे जग जसं दिसतं, तसं आहे, असं मानून जो चालतो, त्याला पावलो-पावली ठेचा लागतात. त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात. म्हणून सांगतो तुम्हांला. या जगांत सज्जनांचा विजय होतो, तो फक्त या कपाटातल्या नाटकांत नि कादंबऱ्यांत. या सरस्वतीच्या मंदिरातनं बाहेरच्या पैशाच्या, प्रेमाच्या, कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा. म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात, हे तुम्हांला दिसेल. हे सारे कवी शुद्ध, निर्मळ दांपत्यप्रेमाचे गोडवे गातात; पण पृथ्वीवर उतरणाऱ्या
...more

