More on this book
Community
Kindle Notes & Highlights
‘जीवन-समुद्र विशाल आहे. चित्रविचित्र आहे. जितका सुंदर, तितकाच भयंकर आहे. पण त्याला ना ऐलतीर, ना पैलतीर! या समुद्रात माणसाचं भक्ष्य असणारी मासळी भरपूर आहे; मात्र माणूस ज्यांचं भक्ष्य बनू शकतो, असे शार्क मासेही काही त्यात थोडे-थोडके नाहीत!’
अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही!
माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही!
दु:ख माणसाला अंतर्मुख करते. हेच खरे! ते दुसऱ्या माणसाशी असलेले आपले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते.
माई फारशी शिकलेली नाही. तिनं शेक्सपिअर वाचलेला नाही; पण तिच्यापाशी दुःख पचविण्याची शक्ती आहे. कारण देवावर तिची खरीखुरी श्रद्धा आहे. आक्का गेली, तेव्हा मिलिंदाला पोटाशी धरून ती दोनच शब्द बोलली, ‘देवाची इच्छा!’ काळजाच्या फुटलेल्या धरणाला या दोन शब्दांनी बांध घातला तिनं! तिची ती श्रद्धा माझ्यापाशी नाही. त्यामुळं जिवाच्या आकान्ताच्या वेळी माणसाला आवश्यक असणाऱ्या श्रद्धेच्या आधाराला मी पारखी झाले आहे. ही माझी एकटीच्याच दुर्दैवाची कहाणी नाही! आमच्या पिढीचं दारुण दु:ख आहे हे! आमच्या मनातली रिकामी पडलेली देवाची जागा कशी भरून काढायची, हा आमच्यापुढला खरा प्रश्न आहे!
रात्रीच्या एकान्तात स्वाभाविक वाटणाऱ्या किती तरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात.
काही प्रसंग मोठे विचित्र असतात. जिवलग माणसाशीसुद्धा मन उघडं करून बोलता येऊ नये, असे! अशा प्रसंगी जिथं कसलाही आडपडदा नसतो, तिथं आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते! आतले काढ आतच खदखदू लागतात.
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही! मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुडपंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं, तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा, किती क्षुद्र दिसेल, याची कल्पना कर. विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत. जन्म हे या परमशक्तीचं वत्सल स्मित आहे, प्रीती हे तिचं मधुर गीत आहे, मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे.
या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळी रूपं घेऊन येतं! स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दुःख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे– हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
“एखाद्या वेळी दुर्दैव जाता-जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत! एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचे डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं; काही वेळा मी जिंकतो. मग हार-जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं.
“पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग आला मला! मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानंच खेळायला बसलो, म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपणच असतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही!”
सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघीही खऱ्या आहेत, पोरी. सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं. शरीरसुखाचा मोह दूर फेकून देऊन, ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिनं सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या शृंखला तिनं लीलेनं तोडल्या! हॅम्लेटच्या आईला ते साधलं नाही. बहुतेक माणसांना ते जमत नाही. ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात. आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत. त्यामुळं वासनांच्या पाशांतून ती कधीच मुक्त होत नाहीत. त्या वासनाच शेवटी त्यांचे बळी घेतात. हॅम्लेटच्या आईची खरी शोकांतिका ही आहे.”
“निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे. पण मातीच्या या भंगुर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीनं या पंखांचा उपयोग केला. त्यामुळं ती आकाशातली नक्षत्रं वेचू शकली. हॅम्लेटची आई या पंखांचं अस्तित्वच विसरली. माणसाची ही जाणीव नाहीशी झाली, की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो, तो नुसता मातीचा पुतळा. कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता-पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो! मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणं लोळत राहतो.
विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं, असं जर मला कुणी विचारलं, तर मी चटकन् उत्तर देईन– मनुष्य! माणसाच्या मनात जशी उच्छृंखल आसक्ती आहे, तशी उदात्त विरक्तीही आहे. बेटी, मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशीही नाही; तो स्वतःशीच आहे.
“या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा-तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यपासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून
...more
जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो. निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो. अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल, त्यालाच, प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता-एक वर आहे, याची प्रचीती येईल.”
या जगात जिथं जावं, तिथं मुखवटे भेटतात! त्यामुळं सत्याची आणि आपली कधी तोंडओळखच होत नाही. माणसांच्या मुखवट्यांची या सोंगाढोंगांची चीड येते मला. नंदाताई, हे जग जसं दिसतं, तसं आहे, असं मानून जो चालतो, त्याला पावलो-पावली ठेचा लागतात. त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात. म्हणून सांगतो तुम्हांला. या जगांत सज्जनांचा विजय होतो, तो फक्त या कपाटातल्या नाटकांत नि कादंबऱ्यांत. या सरस्वतीच्या मंदिरातनं बाहेरच्या पैशाच्या, प्रेमाच्या, कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा. म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात, हे तुम्हांला दिसेल. हे सारे कवी शुद्ध, निर्मळ दांपत्यप्रेमाचे गोडवे गातात; पण पृथ्वीवर उतरणाऱ्या
...more
‘किती विचित्र आहे हे जग! घरच्या माणसांची किंमत कळायलासुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं.”
कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदुःखांशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात, तसेच या अफाट जगात घडले. कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो. कुणी तरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कुणी तरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखविते. कुणी तरी चिमणदातांनी राय-आवळ्याचे दोन तुकडे करून त्यांतला एक आपल्याला देते. योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात
...more
“आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही.”
माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात; नवे निर्माण होतात; पण या नव्या-जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो, तो या गुंफणीतल्या कलेमुळे– गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे.
“गरिबीमुळं माणूस मिंधा बनतो. बाळ, हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकतं! त्याला पापाशी तडजोड करायला लावतं!”
आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे? तो कधी दैवाचे, तर कधी समाजाचे खेळणे होतो. कधी स्वत:च्या, तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्ष्यस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या, तर कधी स्व:च्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागते. बिचारा जन्माला येतो, तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहात सापडून!

