‘शूर्पणखा, तू त्यांच्यावर जितकं प्रेम करतेस, तितकं त्यांनी तुझ्यावर करावं अशी अपेक्षा तुझ्या भोवतालच्या लोकांकडून तू किती काळ करणार? दुसरा तुझ्यावर प्रेम करत नसला, तरी त्याच्यावर प्रेम करण्याची आंतरिक शक्ती मिळव. इतरांना निरपेक्षपणे खाऊ घालून तुझ्या भुकेच्या वर उठ.’ ‘पण मला न्याय हवा आहे.’ शूर्पणखा म्हणाली. ‘किती शिक्षा पुरेशी होईल? दशरथाच्या पुत्रांनी तुला विद्रूप केल्यापासून त्यांना शांती नाही. तरीही तू सतत संतापलेली आणि दुखावलेली आहेस. न्यायाने मानवांचं कधीच समाधान होत नाही. पशू कधीच न्याय मागत नाहीत.’