‘गर्भिणी हरिणीला मारणारी वाघीण तर नक्कीच खलनायक असणार.’ लक्ष्मणाने प्रतिवाद केला. ‘मग त्या वाघिणीने उपाशी राहून मेलेलं तुला चालेल का? तिच्या बछड्यांना कोण भरवेल मग? तू? निसर्गात असंच घडतं. भक्ष्य असतं आणि भक्षक असतो. पळून गेलेल्या हरणाबद्दल वाघीण वाईट वाटून घेत नाही. आपल्या बछड्याचा घास घेणाऱ्या वाघिणीला हरिणी दोष देत नाही. ते त्यांच्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे जात असतात. वनस्पती आणि प्राणी जगतात, पण माणसं बरं वाईट ठरवतात, कारण आपल्याला स्वत:बद्दल चांगलं वाटून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच आपण नायक आणि खलनायक, बळी आणि हुतात्मे यांनी भरपूर अशा कहाण्या रचतो.’ राम म्हणाला.