फिरंगी गावं लुटत नाहीत नुसती स्वामी! किरिस्ताव व्हायला राजी नसलेल्या उभ्या गावची माणसं चूड पेटवून जाळतात भर चौकात! घरचा कर्ता माणूस मेला, तर डोंबाच्या वृत्तीनं सरकारजमा करतात त्याची सारी मालमत्ता. आडा-विहिरीत पावाचे उष्टे तुकडे टाकून, ते पाणी पिताच धर्म बुडला, अशी भूमिका उठवतात. तरण्याताठ्या पोरी बाटवून भिक्षुणी म्हणून नेतात आपल्या देवळात. पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी भरीस घालतात त्यांना दिवसभर आणि रात्री...’’ येसाजींनी मानच खाली टाकली. त्यांच्या पापण्या दहिवरल्या. उपरण्याची मूठ चाळवता-चाळवता गपकन थांबली.