वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड, सुलूख नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा.