कर्णाच्या पानाजवळ सुकुमार पावले आली, नकळत कर्णाची दृष्टी वर गेली. समोर द्रौपदी उभी होती. दोघांची दृष्टी एकमेकांना भिडली होती. द्रौपदीच्या हाती पक्वान्नांचे तबक होते. पदर ढळला होता. तो ध्यानी येताच वाढण्यासाठी वाकलेली द्रौपदी न वाढताच उभी राहिली. कर्णाची दृष्टी पानाकडे वळली आणि त्याच वेळी त्याच्या कानांवर शब्द आले, ‘याचकानं दात्याकडं पाहू नये,’ कर्णाने संतापाने मान वर केली. द्रौपदी पंक्तीमधून भरभर जात होती.