‘युद्धभूमीवर अर्जुनाचं सारथ्य करीत आपण सामोरे याल, तेव्हा धनुष्याची प्रत्यंचा खेचण्याचं बळ राहावं.’ ‘आणि...’ ‘जीवन निष्कलंक राहावं,.. मृत्यू वीरोचित यावा.’ कर्ण कृष्णदृष्टी टाळीत म्हणाला, ‘आप्तस्वकीयांचा वध माझ्या हातून घडू नये...’ काही क्षण उसंत घेऊन कर्ण म्हणून, ‘आणखी एक इच्छा होती...’ कृष्णाच्या गालांवरून अश्रू ओघळले. ते पुशीत कृष्णाने विचारले, ‘कसली इच्छा?’ ‘केव्हातरी आपली बासरी परत ऐकायला मिळावी, असं वाटत होतं. पण ते जमायचं नाही.’ ‘नाही, कर्णा! तुला जरूर मी बासरी ऐकवीन. त्यात कृतार्थता सामावलेली असेल.’ टापांच्या आवाजाने दोघे भानावर आले.