‘महादुर्घट पण आहे. द्रूपदानं मत्स्ययंत्र उभारलंय्, ते भेदण्याचं सामर्थ्य फक्त तुझंच आहे.’ ‘युवराज, हा हट्ट सोडा! तुमच्या कृपेमुळं मला सत्ता, ऐश्वर्य प्राप्त झालंय्. दासदासींनी संपन्न असलेल्या या प्रासादात वृषालीसारख्या सहधर्मिणीसह मी तृप्त आहे. या प्रासादात आणखी एका राज्यकन्येची आवश्यकता नाही.’ ‘आपल्या दुबळेपणाला झाकण्यासाठी केवढं सुंदर कारण सांगितलंस! व्वा! मित्रा, मी प्रसन्न आहे.’ ‘दुबळेपणा झाकण्यासाठी?’ ‘नाहीतर काय? त्या मत्स्ययंत्राचं नाव ऐकताच कौरवसभेतल्या एकेका वीरांनी अनेक कारणं सांगून माघार घेतली. पण एवढं सुरेख कारण मी ऐकलं नव्हतं.’