‘एक मी, अन् दुसरा कर्ण! दैव तरी केवढं विचित्र! मी उपदेश केला अर्जुनाला, अन् नकळत आचरला जातो, तो कर्णाच्या हातून. सुख आणि दु:ख, लाभ अन् हानी, जय अन् पराजय ही दोन्ही सारखी मानून युद्धात उतरणारा कर्णाखेरीज दुसरा वीर कोणता? उद्या रणांगणात तो सूर्यपुत्र अवतरेल, तेव्हा त्याचं तेज प्रसन्न करणारं भासेल. कोणता स्वार्थ आता त्याच्याजवळ राहिलाय्? जीवितसुद्धा त्यानं सुरक्षित राखलं नाही. निर्विकार बुद्धीनं स्नेहासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो कर्ण धन्य होय. पांडव मला दैवगुणसंपत्र समजतात. आपल्या यशासाठी अर्जुनानं माझा आधार शोधला. देवत्वाचा आधार घेऊन विजय संपादन करणारा अन् मित्रप्रेमासाठी उघड्या डोळ्यांनी
...more