सूतकुलात जन्मलेल्या, हीन वृत्ती धरणाऱ्या पुरुषाला मी दोष देत नाही; पण त्याच्या सल्ल्यानं अघोरी कृत्याला उद्दीप्त झालेल्यांचा विवेक गेला कुठं? ही या सभेची अमर्यादा आहे. जोवर हा भीष्म इथं उभा आहे, तोवर अबलेला विवस्त्र करण्याचं धाडस कुणीही करू नये. दुःशासना, मागं फीर ही माझी आज्ञा आहे.’ दुःशासन तसाच उभा राहिला. त्याने दुर्योधनाकडे आशेने पाहिले. दुर्योधनाने स्वत:ला सावरले. आपला संताप आवरीत त्याने विचारले, ‘पितामह, ही आज्ञा कशाच्या बळावर देता आहात?’ ‘काय विचारतोस?’ भीष्म चकित होऊन म्हणाले. ‘ही आज्ञा कशाच्या बळावर देता?’ दुर्योधनाने शांतपणे पुन्हा विचारले.