‘जेव्हा शत्रूनं वेढलं, चारी दिशा व्यापल्या, अटळ पराजय समोर दिसू लागला, त्याच वेळी, वसू, साक्षात तूच समोर उभी राहिलीस अन् एका तुझ्या आठवणीबरोबर जीवनाची सारी आसक्ती उफाळून वर आली. पुरुषत्वाचा अहंकार, स्वाभिमान, अस्मिता साऱ्यांचा क्षणात विसर पडला. जीवनाची सारी आसक्ती तुझ्या रूपानं प्रगट झाली. माझ्या एकाकी जीवनातला एक ओलावा एवढा प्रबळ आहे तर ज्यांच्या जीवनांत उदंड स्नेह उदंड ऐश्वर्य असेल, त्या वीरांचं काय होत असेल? वसू, माझ्या जीवनातील तुझं स्थान किती मोठं आहे, हे मला त्या मृत्यूच्या रेषेवर उभं असता प्रथमच जाणवलं.’