‘त्या प्रकाशानं माझ्या विनवणीला जुमानलं नाही. त्याच्या तेजात मी कधी बद्ध झाले, तेही मला कळलं नाही. तू माझ्या उदरी वाढत होतास. रात्रंदिवस जिवाला सुख नव्हतं. कुमारी माता! पितृकुलाला केवढा कलंक लागला असता! मी विश्वासू सखीसह आश्रमात राहू लागले. ऋषीच्या सेवेत रमलेल्या मुलीचा छंद म्हणून पित्यानंही ते सहन केलं. तुझा जन्म झाला. भर रात्री अश्व नदीच्या लाटांवर तुला सोडलं, ते उरीचा पान्हा आटला होता, म्हणून नव्हे. त्या पितृगृहाच्या निष्ठेनंच ते बळ दिलं. आई होण्याचं दुर्दैव काय असतं, हे तुला कळणार नाही.