‘माझं स्थान!’ कर्ण सावध होत होता. ‘हो! तुझं स्थान पांडवांकडं आहे. मानाचं! ऐश्वर्याचं! हे श्रेष्ठ कौंतेया, तू माझ्याबरोबर पांडवांकडं चल. ते तुझे धर्मनिष्ठ, वीरबाहू पाची भ्राते तुझ्या चरणांना आनंदानं मिठी घालतील. सर्व पांडवपुत्र अन् त्यांचे सहायक राजे तुझ्यापुढ नतमस्तक होतील. अन् द्रौपदी तुला सहावा पती म्हणून स्वीकारील. एवढंच नव्हे, यादवकुलाचा प्रमुख म्हणून मी तुलाच अनुसरीन. दाशार्हांसह दाशार्ण तुझे अनुयायी होतील!’