‘पितामह, महारथी कर्णाबद्दल आपण काहीच बोलत नाही.’ पितामहांच्या चेहऱ्यावर उपहास प्रगटला. ते म्हणाले, ‘राधेयाचं नाव या वीरसभेत घेतोस कशाला? तो राधेय साधा रथीही नाही, मग महारथी कुठला?’ ‘पितामह?’ कर्ण संतापाने उठला. त्याच्याकडे बोट दाखवीत पितामह म्हणाले, ‘तो अर्धरथी आहे.’ सारी सभा गोठून गेली. कर्णाचा चेहरा लालबुंद झाला. अधिरथ-राधाई वियोगापेक्षाही तो घाव मोठा होता. आपल्या साऱ्या भावना संयमित करीत कर्ण म्हणाला, ‘पितामह, कशाच्या आधारावर मला अर्धरथी समजत आहात?’