‘हे! तातांच्या रथपरीक्षेची पद्धत मला माहीत नाही, असं कसं होईल? तातांना समतोल रथ सिद्ध करण्याची कला संपूर्ण अवगत होती, पण तेवढंच ज्ञान रथपरीक्षेला पुरं होत नाही, हे कधीच त्यांच्या लक्षात आलं नाही. सुसज्ज, समतोल रथ बलवान अश्वांकडून जरी ओढला जात असला, तरी रथचक्र दैवगतीनंच फिरत असतं, हे कधीच त्यांच्या मनाला स्पर्शलं नाही. जीवनरथाचंसुद्धा असंच असतं. विद्या, व्यासंग आणि अनुभवानं जीवनरथ असाच सिद्ध होत असतो. केव्हातरी अहंकारापोटी संयमाच्या कुण्या काढून रथपरीक्षा करण्याची इच्छा होते; अन् सामान्य मोहाचा खळगासुद्धा जीवनावर मात करण्यास समर्थ ठरतो.’