‘द्रौपदी, तुझी जागा इथं आहे, बघ!’ म्हणत दुर्योधनाने कर्दळीच्या स्तंभाप्रमाणे सर्व लक्षणयुक्त, वज्रासारखी दृढ असलेली आपली मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवली. सारी भूमी सूर्यदाहात होरपळत असता आसमंत भेदून मेघनाद उमटावा, तसा भीम गर्जला, ‘नरेंद्रहो! माझी प्रतिज्ञा ऐकून ठेवा. ज्या दुःशासनानं द्रौपदीच्या केसांना स्पर्श केला, त्याचं वक्षस्थळ नखाग्रांनी फोडून मी त्यांच रक्त प्राशन करीन अन् उन्मत्तपणं भरसभेत उघडी मांडी दाखवणाऱ्या दुर्योधनाची मांडी मी माझ्या गदेनं छिन्नविछिन्न करून टाकीन, तव्हाच माझी प्रतिज्ञा पुरी होईल.’