‘कर्णा, आता लौकरच पांडवांचा वनवास संपेल. अज्ञातवासाचं वर्ष उलटताच ते प्रगट होतील. वर्षा-ऋतूत क्षुधेनं व्याकूळ झालेले मृगेंद्र वर्षा-ऋतू संपताच मृगयेसाठी जसे बाहेर पडतात, तसे पांडव बाहेर पडतील- पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी. त्या पांडवांच्या भावी विजयासाठी प्रत्यक्ष इंद्र उद्या तुइयाकडं येईल.’ ‘देवेंद्र इंद्र? अन् माझ्याकडं?’ ‘हो! अन् तोही याचक म्हणून.’ ‘पण इंद्रदेवांना पांडवांसाठी कष्ट घेण्याचं कारण?’ ‘कारण जसा तू साझा भक्त आहेस, तसा अर्जुन इंद्राचा.’