‘मित्रा, हा पाठीत वार कुणी केला?’ चक्रधराने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ‘दुःशासनाला वीरशय्या देत होतो. त्याच्यावर शेला झाकीत असता कुणीतरी मागून हा वार केला. कर्णा, हे रणांगण खरं नाही. इथं धर्माला, नीतीला अवसर नाही. इथं धर्माची वल्गना चालते. कृती अधर्माचीच असते. भीष्म द्रोण, साऱ्यांची कथा तीच. या रणभूमीत तुला यश नाही. मित्रा, सावध राहा. जप. मी जातो.’