‘परिणाम कसला? फार तर युद्धात मरेन मी! एवढंच ना? क्षत्रियाला त्याहून श्रेष्ठ मृत्यू नाही. युद्धात अस्त्रांनी जर मरण आलं, तर आम्ही स्वर्गालाच जाऊ. कृष्णा, वेळूप्रमाणं अस्थानीही भग्न व्हावं, पण कुणापुढं नम्र होऊ नये, हे श्रेष्ठ वचन आहे. माझ्या पित्याकडून जो राज्यांश मला मिळालाय्, तो मी जिवंत असेपर्यंत कुणाला परत देणार नाही. जोवर राजा धृतराष्ट्र प्राण धारण करीत आहेत, तोवर आम्ही व ते पांडव यांतील कोणत्या तरी एका पक्षानं क्षत्रिय धर्माचा त्याग करून, भिक्षुकाप्रमाणं आयतं सिद्ध असलेलं अत्र भक्षण करूनच जिवंत राहिल पाहिजे.