‘माते! या कर्णानं एकदाच असत्याची कास धरली- गुरुदेव परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी.’ ‘कर्णा, मी ऐकलंय् की, द्रौपदी राजसभेत दासी म्हणून गेली, तेव्हा तिच्या वस्त्रहरणाचा सल्ला तू दिलास. मला ते खरं वाटत नाही. माझ्या कुशीत जन्मलेलं पोर असल्या अधर्माला प्रवृत्त होईल, यावर माझा विश्वास बसत नाही. ते शल्य माझ्या मनाला सदैव बोचतं. सांग, कर्णा, ते खोतं आहे हे ऐकायला मी आतुर झाले आहे.’ कर्ण क्षणभर त्रस्त झाला. त्या आठवणीबरोबर साऱ्या भावना उफाळून आल्या. ‘अगदी खरं! ते मी सांगितलं, हे अगदी खरं आहे.’