‘हो!’ निश्चयी सुरात द्रौपदी उद्गारली, ‘सूतपुत्राला मी वरणार नाही, असं सांगितलं. असले दहा मत्स्यभेद यानं केले, तरी मी त्याला कधीही प्राप्त होणार नाही. दादा, सांग त्याला. म्हणावं, कावळ्यानं राजहंसीकडं पाहू नये.’ कर्ण उठून उभा राहिला. हातचे धनुष्य त्याने फेकून दिले. आपली घायाळ दृष्टी त्याने उंचावली. सूर्यदर्शन घडताच, क्रोधाने जळत असताही त्याच्या मुखावर एक विकट हास्य प्रगटले. तो सूर्याकडे पाहून हसला. ते हसणे त्याच्या क्रोधाहून तीव्र होते.