‘शकुनिमहाराज, सम्राटांनी सुरुवातीलाच सांगितलंय् की, द्यूत हे पापाचं मूळ आहे. द्यूतकार नेहमीच कपटाचा अवलंब करतात.’ शकुनि हसले, ‘राजा, तू ज्ञानी आहेस. या जगातलं आह्वान असंच असतं. विद्वान अविद्वानाला, अस्त्रज्ञ अकृतास्त्राला अन् बलवान दुर्बलाला असंच आह्वान देत असतो. तुला माझी भीती वाटत असेल, तर याच वेळी द्यूतातून परावृत्त हो!’ क्षणात युधिष्ठिराची मान ताठ झाली. आपले उत्तरीय सावरीत तो पायऱ्या उतरत द्यूतपटाकडे जात असता म्हणाला, ‘मी द्यूताला तयार आहे.’