‘राधेया, योग्य वेळी आलास. मी उपस्थित नसता, तुम्ही सहा वीरांनी माझा अभिमन्यू मारला. आज मी तुझ्या पुत्राचा वध करतो, बघ. सामर्थ्य असेल, तर वाचव त्याला.’ त्या शब्दाबरोबरच तो अघोरी बाण अर्जुनाच्या धनुष्यातून सुटला होता. कर्णाच्या विचाराला अवधी मिळण्याआधीच त्या बाणाने आपले लक्ष्य अचूक टिपले होते. बाणाच्या झोताबरोबरच, प्राजक्ताचे फूल गिरक्या घेत भूमीवर उतरावे, तसा सुकुमार वृषसेन रथाखाली ढासळला.