कर्णाकडे न पाहता मद्रराज घोडी घेऊन जात होता. ते दृश्य हताशपणे पाहत असता कानांवर आलेल्या घनगंभीर आवाजाने कर्णाला सावध केले. त्याने पाहिले, तो अर्जन-रथ कर्ण-रथाच्या दिशेने येत होता. कर्णाने क्षणात स्वत:ला सावरले आणि त्याने रथाखाली उडी घेतली. रथचक्राच्या आऱ्यांना हात घातला. सारी शक्ती पणाला लाबून तो चक्र वाढण्याचा प्रयत्न करू लागला. दंडाचे स्नायू तटतटले, पण चक्र तसूभरही हलले नाही कर्णाचे मन व्याकुल झाले. त्याच्या कोणत्याच प्रयत्नाला यश येत नव्हते. तप्त वाळूत रुतलेले चक्र तसेच अचल होते.