दुसऱ्या दिवशी कौरवश्रेष्ठांच्या मुखावर चिंता प्रगटली. अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथवध करण्याची प्रतिज्ञा केली होती. कर्णाला ते दुर्योधनाने सांगताच कर्ण चकित झाला. कर्णाने विचारले, ‘जयद्रथवधाची प्रतिज्ञा! का?’ ‘अभिमन्यूवधाचा सूड, म्हणून!’ दुर्योधनाने सांगितले. तशा स्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर हसू प्रगटले. ‘छान! अभिमन्यूवधाच्या वेळी जयद्रथ तिथं नव्हता. तरीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा! ‘ते काही असो. पण जयद्रथाला वाचवायला हवं. तो भयभीत झालाय्.’